पंढरीनाथा यंदा वारी चुकली बघ,लय झालं घरात बसून म्हनून तुझ्याशी बोलायलोय बघ,कळना झालय ह्यो योग तरी कसला आला.तुला बी माहीत नव्हतं व्हय, कधी ह्यो रोग आला,आर तुझ्या दारी मला येता येईना झालंय बघ.घरातली रखुमाई मात्र रोज डोकं खातीया बघ,ती म्हनती घरचा विठ्ठल इटेवर न्हाय तरबेड वर आडवा असतोय बघ,काम करता करता, पोटावर लॅपटॉप घेऊन झोपतोय मग.वारीत आता कुनीच न्हाय यायचं म्हणून निवांत हायस तू यंदा,पण तुला असं एकटं सोडत असतोय व्हय,आर तुझाच हाय ह्यो पक्का बंदा.आरं घरा घरात तुझ्या मुर्त्या हायत,समदी अभिषेक करत असतोय बघ.उपास बी असणार आन मुखी तुझं नाम,हरिनामाची ओवी गात, जागवीन सारं रान,रुसू नकोस असा पांडुरंगा, तुला रखुमाईची आन हाय,तुझ्या लेकरांनी तुला भेटायचं न्हाय, असं कधी व्हनार बी न्हाय.यंदा घरातच तुझा जागर, आनं मनामंदी दिंडी हाय,भेटी लागी जिवा म्हणत, डोई रामकृष्णाची हंडी हाय.मात्र पुढल्या वक्ताला आसं व्हता कामा नये,त्यो काय कोरोना हाय त्यो परत दिसता कामा नये.आरं गर्दीत तर तुझं रुपडं लय ग्वाड दिसतं,ती गर्दी मात्र परत जमू दे.तू कमरेवर हात ठेव तसाच,ते फकस्त तुलाच शोभून दिसतं.लेकरांनवरची माया कमी नको करू देवा,रखुमाईला सांग की पोरगं नक्की येतंय भेटाया.
जय जय रामकृष्ण हरी !